खासगी रुग्णवाहिकेकडून लूट! नागपूर जायचेय आठ हजार द्या…चंद्रपूर जायचे असेल तर १२ हजार मोजा; रुग्णांच्या नातेवाइकांकडून आकारले जातेय अधिकचे भाडे

वर्धा : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिक चिंतेत आहेत. याच परिस्थितीचा फायदा घेत खासगी रुग्णवाहिकेमध्ये ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिकेकडून रुग्णांच्या नातेवाइकांची लूट सुरू आहे. नागपूरला रुग्ण घेऊन जायचे असल्यास आठ हजार रुपये, तर चंद्रपूर येथे जायचे असल्यास १२ हजार रुपये अधिकचे भाडे आकारण्यात येत असून रुग्णांच्या नातलगांची एकप्रकारे लूट सुरू आहे.

मृतदेह स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी कुटुंबीय व नातेवाइकांकडून खासगी रुग्णवाहिकाचालक तासाला अव्वाच्या सवा पैसे घेत आहेत. इतकेच नव्हेतर रुग्णांना बाहेर जिल्ह्यातील रुग्णालयांत नेण्यासाठीही अधिकचे भाडे आकारण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. एका रुग्णाला वर्ध्याहून नागपूरच्या रुग्णालयात नेण्यासाठी चक्का खासगी रुग्णवाहिकाचालकाने आठ हजार रुपये भाडे आकारले तर हिंगणघाट येथून चंद्रपूरला जाण्यासाठी तब्बल १२ ते १४ हजार रुपये आकारण्यात आल्याने रुग्णांच्या नातलगांची चांगलीच लूट होत आहे. हे म्हणजे मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत चालली आहे. यामुळे खासगी तसेच कोरोना सेंटर हाऊसफुल्ल झाली आहे. शिवाय घरी उपचार घेत असलेल्या गंभीर रुग्णाला रुग्णालयात जाण्यासाठी खासगी रुग्णवाहिकेमध्ये ऑक्सिजन सेवा उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिकेच्या शोधात रुग्णांच्या नातेवाइकांना फिरावे लागते. उपप्रादेशिक परिवहन विभागाने दर ठरवून दिलेले असताना रुग्णांच्या नातेवाइकांना खासगी रुग्णवाहिकेच्या चालक मालकांकडून लुटले जात आहे. खासगी रुग्णवाहिका सेवेच्या नावाखाली व्यवसाय करीत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या संकटकाळात ऑक्सिजन सेवा असलेली रुग्णवाहिका मिळणे हे भाग्य असल्याचे समजून रुग्णांचे नातेवाईक रुग्णवाहिका चालकाचे भाडे आकारणी करेल तेवढे देत आहे.याकडे उपप्रादेशिक परिवहन विभागाने लक्ष दिल्यास नागरिकांना लुटणाऱ्या खासगी रुग्णवाहिकेचे चालक मालक सुतासारखे सरळ होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here