वर्धा : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वर्धा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डवर आता सोमवारीही भाजीपाल्याच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार होणार आहे. तर एप्रिल महिन्यात शनिवारी आणि रविवारी भाजीपाल्याच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार बंद राहणार आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या मिनी लॉकडाऊननंतर बाजार समिती प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे यापुर्वी सोमवारी हा व्यवहार बंद राहत होता; पण आता सोमवारी भाजीपाल्याची खरेदी-विक्री होणार असल्याने याचा फायदा जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.
प्रात माहितीनुसार, वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी बाजारात सुमारे २५० अडते व खरेदीदार आहेत. यांच्याच माध्यमातून शेतकऱ्यांनी पिकविलेला भाजीपाला खरेदी केला जातो. सकाळी ५ ते ९ या वेळेत लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर भाजीपाला जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचविल्या जातो. मिनी लॉकडाऊनमुळे शनिवारी आणि रविवारी जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात सक्तीची संचारबंदी लागू राहणार असल्याने सोमवारी भाजीपाल्याची खरेदी-विक्री व्हावी अशी मागणी भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची होती.
याच मागणीवर सहानुभूतीपूर्वक विचार करून सोमवारी भाजीपाल्याच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार सुरू ठेवण्याचा निर्णय वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतला आहे.