सेलू : तालुक्यातील कोटंबा ते धपकी रस्त्यावर मोठमोठे खड्डे तयार झाले असून वाहनधारकांचा जिव टांगणीला लागला आहे. त्या रस्त्यावरून समृध्दी महामार्गाचे कामावरील कंत्राटदारांची रोज शेकडो अवजड वाहने धावत असल्याने रोडची चाळणी झाली आहे.
तालुक्यात समृध्दी महामार्गाचे काम सुरू आहे. त्या कामासाठी लागणारे मुरूम, गोटा, माती तेथील परिसरातील पडीक शेतातून आणि टेकडीवरून आणली जाते. ही भरलेली अवजड वाहने रोज त्या रस्त्याने धावतात. तसेच समृध्दी मार्गाचे काम करणाऱ्या ऍपकॉन कंपनीचे कोटंबा शिवारात गिट्टी क्रशर असल्याने गिट्टी भरलेली शेकडो टिप्पर त्या रोडने चालतात. त्यामुळे सहा किलोमीटर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने खड्यामध्ये पाणी साचून राहात असून रस्त्यातून वाहन कसे काढावे याची चिंता वाहन धारकांसमोर निर्माण झाली आहे.
कोटंबा, धपकी, आजनगाव, चारमंडळ, जुनोना या गावातील नागरिकांना हा रस्ता सोयीचा असून त्या सर्वांचे त्याच रस्त्याने जाणे येणे सुरू आहे. तसेच हिंगणघाट येथे जाण्यासाठी मार्ग उपयोगाचा आहे. त्यामुळे त्या रस्त्याने वाहनांची नेहमी वर्दळ सुरू असते. परंतु समृध्दी महामार्गाचे कामावरील ऍपकॉन कंपनीच्या अवजड वाहनांनी रस्त्याची चाळणी झाल्याने अनेकदा अपघातही झाले आहे. ऍपकॉन कंपनीच्या मुजोर अधिकाऱ्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना हाताशी धरल्याने त्यांचा येथे बेबंदशाही कारभार सुरू आहे. त्यामुळे ऍपकॉन कंपनी विरोधात येथे प्रचंड असंतोष खदखदत असून जनतेच्या भावनेचा उद्रेक होण्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.