पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्याने ठाकरे सरकार निर्धास्त झाले आहे. नऊ सदस्यांची बिनविरोध निवड झाली. यापैकी सात जण हे विधान परिषदेवर नवीन आहेत.
ठाकरे हे पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. नीलम गोऱ्हे या विधान परिषदेवर तिसऱ्यांदा निवडून गेल्या आहेत. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी या पूर्वी विधान परिषदेचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर ते राज्यसभेत गेले होते. आता पुन्हा विधान परिषदेत आले आहेत. शशिकांत शिंदे हे या आधी दोन वेळा विधानसभेचे सदस्य होते. 2019 च्या निवडणुकीत पराभव झाल्याने त्यांची आता विधान परिषदेवर वर्णी लागली आहे. याशिवाय गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके, रमेश कराड, अमोल मिटकरी आणि राजेश राठोड हे पहिल्यांदाच आमदार झाले आहेत.भाजपचे डॉ. अजित गोपछडे, संदीप लेले; राष्ट्रवादीचे किरण पावसकर, शिवाजीराव गर्जे या चार उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतले. १४ उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रांपैकी एका उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र बाद अवैध.
ठाकरे हे विधान परिषदेवर निवडून गेल्याने मात्र पितापुत्रांच्या चार जोड्या विधीमंडळात दिसणार आहेत. यातील चारही पिता ज्येष्ठांच्या सभागृहात आहेत. उद्धव यांचे चिरंजीव आदित्य हे वरळी हे विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. शिवसेनेचे दुसरे नेते व माजी मंत्री रामदास कदम हे पण विधान परिषदेत असून त्यांचे चिरंजीव योगेश विधानसभेचे सदस्य आहेत. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे वडील अरुणकाका जगताप हे पण विधान परिषदेत आमदार आहेत. पितापुत्रांची एक जोडी विधान परिषदेतच आहे. त्यात अकोला स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघातून गोपीकिशन बजोरीया हे निवडून आले आहेत. त्यांचे चिरंजीव विप्लव हे हिंगोली-परभणी स्थानिक स्वराज्य मतदारंघातून विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे पितापुत्रांच्या चार जोड्या विधीमंडळात आहेत.
या आधी माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे पण विधान परिषदेचे सदस्य आणि त्यांचे चिंरजीव नितेश हे विधानसभेत आमदार अशी जोडी होती. आता नारायण राणे हे राज्यसभेचे खासदार आहेत.
या पितापुत्रांच्या जोड्यांनुसार सासरे व जावई अशी जोडी विधीमंडळात आहेत. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांचे जावई राहुल नार्वेकर विधानसभेत आमदार आहेत. गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे विधान परिषदेत तर त्यांचे पुतणे ऋतुराज पाटील हे विधानसभेत आहेत. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे आठव्यांदा विधानसभेचे सदस्य म्हणून गेल्या निवडणुकीत निवडून आले. त्यांचे मेव्हणे सुधीर तांबे हे विधान परिषदेत आमदार आहेत.