पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
लॉकडाऊनमुळे बारावीचा निकाल वेळेत लागणार की नाही, याबाबत साशंकता असताना बोर्डाने मात्र १० जूनपूर्वी निकाल लावण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे तपासलेल्या उत्तरपत्रिका गोळा करण्यासाठी थेट यवतमाळात टिम पाठविण्यात आली असून तालुकानिहाय वेळापत्रकानुसार पेपर नेले जात आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वीच बारावीच्या परीक्षा आटोपल्या होत्या. मात्र दहावीचा एक पेपर होऊ शकला नाही. तर लॉकडाऊन काळात शाळा-महाविद्यालये बंद झाल्याने व शिक्षकांनाही संचारास बंदी असल्याने उत्तरपत्रिकांच्या तपासणीवर परिणाम झाला होता. त्यामुळे निकालास विलंब होण्याची शक्यता वर्तविली गेली होती.मात्र अमरावती बोर्डाने १० जूनपूर्वीच बारावीचा निकाल घोषित करण्याचे नियोजन जाहीर केले आहे.
त्यासाठी उत्तरपत्रिका गोळा करून नेण्यासाठी वाहतूक पास देण्याबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनाही सूचित करण्यात आले आहे. दरम्यान, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या लेखी आदेशानुसार आता उत्तरपत्रिकांची ने-आण करणाऱ्यांना वाहतूक पास देण्याचे अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना बहाल करण्यात आले आहे.
आता अमरावती बोर्डाने एक टिम जिल्ह्यात पाठविली असून ही टिम तालुकानिहाय उत्तरपत्रिका गोळा करीत आहे. त्यासाठी यवतमाळातील अभ्यंकर कन्याशाळा हे केंद्र निश्चित करण्यात आले आहे. तेथे थांबलेल्या बोर्डाच्या टिमकडे तालुका पातळीवरील शिक्षकांमार्फत (नियामक) उत्तरपत्रिका जमा केल्या जात आहे. त्यांना यवतमाळात येण्यासाठी गटशिक्षणाधिकाºयांच्या मार्फत नियामकांना वाहतूक पास दिले जात आहे.
सोमवारपर्यंत आटोपणार गोळाबेरीज
बोर्डाच्या नियोजनानुसार बुधवारी यवतमाळ आणि आर्णी तालुक्यातील उत्तरपत्रिका गोळा करण्यात आल्या. तर गुरुवारी घाटंजी, पांढरकवडा, वणी, झरीजामणी आणि मारेगावच्या उत्तरपत्रिका स्वीकारण्यात आल्या. आता शुक्रवारी राळेगाव, कळंब, बाभूळगाव, महागाव आणि उमरखेड तर सोमवारी पुसद, दारव्हा आणि दिग्रस तालुक्यातील उत्तरपत्रिका यवतमाळच्या अभ्यंकर कन्याशाळेत गोळा केल्या जाणार आहेत. त्यानंतर निकाल तयार करण्याच्या कामाला अमरावतीमध्ये गती येणार आहे. या गतीवरच निकालाची १० जूनची तारीख पाळणे शक्य होणार आहे.