पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषद निवडणुकीसाठीचे उमेदवार प्रविण दटके यांच्या विरोधात नागपूरातील वकिल सतीश उके यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. दटके यांनी त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती आपल्या निवडणूक अर्जामध्ये लपविल्याचा आरोप ऍड. सतीश उके यांनी केला आहे.
प्रविण दटके यांच्या विरोधात 2006 सालच्या फौजदारी प्रकरणात कलम 181,182, 200 नुसार गुन्हा दाखल आहे. यावर नागपूर येथील जिल्हा न्यायालयामध्ये सुनावणी सुरु आहे. मात्र, होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणूकीसाठी त्यांनी दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये ही माहिती लपविल्याचा आरोप ऍड.उके यांनी केला. त्यामुळे, त्यांच्यावर लोकप्रतिनिधी कायद्यातील कलम 125 (अ) नुसार कारवाई करण्यात यावी, अशी विनंती ऍड. सतीश उके यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या तक्रार अर्जामध्ये केली आहे. तसेच, त्यांचा अर्ज रद्द करुन निवडणूक प्रमाणपत्र देऊ नये, अशी देखील विनंती त्याद्वारे केली आहे.