पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे यांनी त्यांच्या घरातील व्यक्तींना उमेदवारी दिल्या, तेव्हा अन्य इच्छुक नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला नाही का, असा खोचक सवाल करीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘मुंगी होऊन साखर खाणे चांगले’, असा सल्ला खडसे यांना दिला. त्यांना पक्षाने आतापर्यंत बरेच काही दिले असून काम केले, त्या बदल्यात काही मिळालेच पाहिजे, ही भावनाच चुकीची असल्याचे सांगितले.
विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या खडसे यांनी पक्षाने विश्वासघात केल्याची, पाठीत खंजीर खुपसल्याची, उपऱ्यांना तिकिटे दिल्याची भावना व्यक्त केली आहे. त्याला प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.खडसे यांनी पक्षासाठी अनेक वर्षे काम केले व त्यांच्याबद्दल पक्षात आदरच आहे. मी व देवेंद्र फडणवीस यांनी खडसे, पंकजा मुंडे व बावनकुळे यांना उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न केले. पण केंद्रीय नेतृत्वाने नकार दिला. पक्षाने आतापर्यंत खडसे यांना अनेकदा उमेदवारी दिली, विधानसभेसाठी मुलीला दिली. हरिभाऊ जावळे हे खासदार असताना त्यांना जाहीर झालेली उमेदवारी बदलून खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे यांना देण्यात आली होती. त्यांच्या मुलालाही विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्या मुलीला जिल्हा बँक, पत्नीला महानंद संस्थांमध्ये पदे मिळाली. त्या वेळी जावळे, गुरुमुख जगवानी यांची समजूत जशी काढली, तशी खडसे यांनी आता काढून घ्यावी.
पक्षाने आतापर्यंत त्यांना बरेच काही दिले. पक्षासाठी काम करणे म्हणजे मंत्रिपद, खासदार, आमदार पद नाही, त्यांनी मार्गदर्शक म्हणून पक्षाचे काम पाहावे. ते आमच्याबरोबर राहावेत, अशीच इच्छा आहे, असेही पाटील यांनी सांगितले.
खडसेंना एवढे देऊनही ते जाहीरपणे विरोधात बोलतच आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली नसावी, असे सूचक वक्तव्य करीत मुंगी होऊन साखर खाण्याचा सल्ला पाटील यांनी दिला. पक्षातील वाद चव्हाटय़ावर मांडणे योग्य नाही, ती पद्धत नाही, असेही पाटील यांनी सुनावले.