मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होण्यापूर्वी राज्यातील जनतेला सर्वतोपरी खूश करण्याचे प्रयत्न राज्यातील महायुती सरकारकडून सुरू आहेत. एकीकडे लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात पाठवल्यानंतर आता शेतकऱ्यांना खूश करण्याची तयारी सरकारकडून करण्यात आली आहे.
त्याचाच भाग म्हणून पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनांचे ऑगस्ट २०२४ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीतील अनुक्रमे अठराव्या आणि पाचवा हप्त्याचे पैसे ५ ऑक्टोबर रोजी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी सकाळी ११.०० वाजता वाशिम येथील समारंभामधून ही रक्कम वितरित करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यवतमाळ -वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.