वर्धा : वडिलांची हत्या करणाऱ्या मुलास आजन्म कारावासाची शिक्षा आणि १५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठाविण्यात आली. हा निर्णय जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. पी. आदोने यांनी दिला. मंगेश कवडू पंढरे (32) रा. बोरगाव ता. सेल असे शिक्षा लागलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपी मंगेश याने राहत्या घराच्या बाजूला असलेल्या गोठ्यात झोपून असलेले वडील कवडू यांच्याशी मद्यधुंद अवस्थेत शिवीगाळ करून शाब्दिक वाद केला. वडिलांना हटकले असता मद्यपि मंगेशने लोखंडी कुऱ्हाडीने कपाळावर, चेहेऱ्यावर तसचे छातीवर वार करून ठार मारले होते. याप्रकरणी सिंदी रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ करण्यात आले होते. न्यायालयाने आरोपी विरूद्ध दोषारोप निश्चित करून प्रकरण पुराव्यांकरिता ठेवले. पैरवी अधिकाऱ्यांनी मुद्देमाल न्यायालयात जमा केला व रासायनिक विश्लेषणाचे अहवाल प्राप्त करुन न्यायालयात सादर केले.
याप्रकरणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, घटनास्थळ पंच, शेजारी साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, सीए माल पोहचविणारे व तपासी अधिकाऱ्यांना पैरवी अधिकाऱ्यांनी वेळोवेळी हजर ठेवण्याची तसदी घेतली तसेच परिस्थितीजन्य पुराव्या आधारे प्रकरणात दोषसिद्धी होण्यास मदत मिळाली. प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक वंदना सोनुने यांनी केला. आरोपीने गुन्हा केल्याचा सबळ पुरावा उपलब्ध झाल्यामुळे आरोपी मंगेश पंढरे याला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठाविण्याता आली. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता एच. पी. रणदिवे यांनी कामकाज हाताळले. प्रकरणात १३ साक्ष झाल्या. पैरवी अधिकारी अनंदा कोटजावोरे यांनी सहकार्य केले.