हिंगणघाट : येथील नगरपरिषदमध्ये कार्यरत तत्कालीन कर विभागाच्या कर्मचाऱ्याला टॅक्सच्या रकमेत अफरातफर केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले होते. या कारवाईला जवळपास दहा वर्षांच्या वर झाले असून सदर कर्मचाऱ्याला कामावर घेतो असे सांगून त्याच्याकडून लाच मागणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांच्या संबंधात निलंबित कर्मचारी तिवारी यांनी न. प. मुख्याधिकारी हर्षल गायकवाड यांच्याकडे तक्रार केली होती. अखेर त्या तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले तर एका अधिकाऱ्यावर निलंबनाची टांगती तलवार आहे.
मुख्याधिकारी गायकवाड यांनी कठोर पावले उचलत न. प.चे वरिष्ठ लिपिक सागर डेकाटे, कोर्ट लिपिक अमर रेवते व मिळकत विभागाचे वसंत रामटेके यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले. याप्रकरणात अधीक्षक रोहित जमदाडे यांनाही निलंबित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविला आहे. अशी माहिती नगरपरिषद प्रशासनाने दिली आहे. यासंदर्भात नगरपरिषद प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार संजय तिवारी हा नगरपरिषद मालमत्ता कर विभागात टॅक्स कलेक्टर म्हणून कार्यरत होता. त्याने बारा लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी त्याला निलंबित केले होते. निलंबन प्रस्तावाला संजय तिवारी यांनी न्यायालयात आव्हान दिले. कनिष्ठ न्यायालयात तिवारी यांच्या बाजूने निकाल लागला.
मात्र, न. प.ने निकालाविरोधात वरिष्ठ न्यायालयात याचिका दाखल केली. कनिष्ठ न्यायालयाच्या निकालाच्या आधारावर वरील निलंबित तीन कर्मचारी व अधीक्षक यांनी संजय तिवारी तुला कामावर घेतो असे म्हणून मोठ्या रकमेची लाच मागितली. या संबंधात संजय तिवारी यांनी लेखी तक्रारीदारे न. प. मुख्याधिकाऱ्यांना कळविले. त्या तक्रारीची शहानिशा केल्यावर तीन कर्मचारी दोषी आढळल्याने न. प. मुख्याधिकारी हर्षल गायकवाड यांनी वरिष्ठ लिपिक सागर डेकाटे, अमर शेवते व वसंत रामटेके यांना तडकाफडकी निलंबत केले. या कारवाईमुळे संपूर्ण नगर परिषदेच्या वर्तुळात खळबळ माजली आहे.