पवनार : येथील धाम नदीपात्रातून अवैधरित्या रेतीची वहतूक करणाऱ्या तीन ऑटोवर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करीत ऑटो जप्त केले. ही कारवाई मंगळवार (ता. १२) सकाळी ८ वाजताच्या सुमारास विनोबा भावे आश्रम परिसरालगत धाम नदीच्या लहान पुलाखाली करण्यात आली. या कारवाईने रेती तस्करी करणाऱ्यांचे धाबे दाणानले आहे.
गेल्या काही दिवसापासून धाम नदीपात्रातील लहान पुलाखालून मजूराच्या साहायाने अवैधरित्या रेतीचा उपसा करून अॅटोच्या साहायाने ती विक्री केल्या जात होती. त्यामुळे नदीपात्रात ठिकठिकाणी खड्डे पडलेले होते. मात्र रेती तस्कर राजरोसपणे रेती उपसा करुन चोरी करीत होते. याची माहिती येथील तलाठी संजय भोयर यांनी वरिष्ठांना दिली असता महसूल विभागाच्या चमूने सदर परिसरात सपाळा रचून नदी पात्रातून अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करीत वाहने जप्त केले.
यात निखिल मांजरे, वय २२ वर्षे रा. पवनार इब्राराहीन शेख, वय ३५ वर्षे रा. मसाला, प्रविण पाहुणे वय ४२ रा. पवनार असे कारवाई करण्यात आलेल्या ऑटोचालकांची नावे आहेत. ही कारवाई तहसीलदार यांच्या निर्देशानूसार नायब तहसीलदार अजय धर्माधिकारी, मंडळ अधिकारी प्रवीण हाडे, कुमार बारसागडे, तलाठी संजय भोयर, तलाठी देवेंद्र नेहारे, प्रदीप इंगळे, सेवाग्राम पोलिसांकडून करण्यात आली.