अकरा किलो गांजा सोडून तस्कराचा पोबारा! लोहमार्ग पोलिसांत गुन्हा नोंद

वर्धा : गांजा वाहतुकीचे मोठे हब होऊ पाहणाऱ्या सेवाग्राम रेल्वे स्थानक परिसरातून एका गांजा तस्कराने यशस्वी पळ काढला. या प्रकरणी रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांच्या तक्रारीवरून वर्धा लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे. असे असले तरी वर्धा रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी दहा किलो ६१४ ग्रॅम गांजा जप्त केला आहे.

रेल्वेचा प्रवास करून मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी सेवाग्राम रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या प्रवाशांच्या साहित्याची पाहणी करण्यास सुरूवात केली. याच दरम्यान एका गांजा तस्कराने त्याच्या जवळील स्कुल बॅग मधील १० किलो ६१४ ग्रॅम गांजा सेवाग्राम रेल्वे स्थानकाच्या परिसरातच बेवारस सोडून तेथून यशस्वी पळ काढला.

बेवारस बॅग मध्ये संशयास्पद साहित्य असू शकते असा कयास बांधत रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी बॅग मधील साहित्याची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला. त्यानंतर हा १ लाख सहा हजार १०४ रुपये किंमतीचा गांजा जप्त करून पुढील कारवाईसाठी हे प्रकरण वर्धा लोहमार्ग पोलिसांकडे वळते करण्यात आले. या प्रकरणातील गांजा तस्कराचा शोध घेतला जात असून ही कारवाई पोलीस निरीक्षक आर. एस. मीना, उपनिरीक्षक ए. के. शर्मा, उपनिरीक्षक विनोद मोरे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here