विना रॉयल्टी वाळू वाहतूक भोवली! तिघांवर गुन्हे दाखल करून अटक; वाळू, ट्रॅक्‍टर, ट्रॉली असा ९.१५ लाखांचा मुद्देमाल केला जप्त

वर्धा : वाळूघाटांचे लिलाव न झाल्याने वाळूचा अवैधरीत्या उपसा करून विनापरवाना वाहतूक केली जात आहे. पोलिसांनी वाळू चोरट्यांविरुद्ध मोर्चा उघडला असून, दररोज कारवाई केली जात आहे. आजगाव शेतशिवारात देवळी पोलिसांनी २७ रोजी रात्रीच्या सुमारास कारवाई करीत विनापरवाना वाळू वाहतूक केल्याप्रकरणात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून ट्रॅक्‍टर ट्रॉलीसह ९ लाख १५ हजार २०० रुपयांचा वाळूसाठा जप्त केला. ट्रॅक्‍टर चालक अजय रामचंद्र चहारे, ट्रॅक्‍टर मालक प्रशांत दौलत वाडगुडे, मजूर श्याम नागोराव बैलमारे (तिघे रा. वायगाव नि.) असे वाळू चोरट्यांची नावे आहे.

भदाडी नाल्यातून वाळूचा वारेमाप उपसा सुरू असल्याची माहिती देवळी पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी आजगाव शिवारात नाकाबंदी केली असता ट्रॅक्‍टर येताना दिसला. पोलिसांनी ट्रॅक्टर थांबवून पाहणी केली असता ट्रॉलीमध्ये वाळू भरून असलेली दिसली. चालकाला परवाना व रॉयल्टीं बाबत विचारणा केली असता चालकाकडे परवानाही नव्हता. पोलिसांनी एमएच ३२ एएच ६६६३ क्रमांकाचा ट्रॅक्‍टर व ट्रॉली आणि १ ब्रास वाळू, फावडे, टिकास, मोबाइल असा एकूण ९ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. देवळी पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध गौण खनिज चोरीबाबतचा गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here