पवनार : जिल्ह्यात दारुबंदी असतानाही मोठ्या प्रमाणात दारुविक्री होत होती. राजरोसपने चालू असलेल्या या दारुविक्रीच्या विरोधात नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी कठोर भूमिका घेत जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात दारुबंदीची मोहीम राबविण्याचे आदेश दिले. त्याच अनुषंगाने आज पवनार ग्रामपंचायत कार्यालयात सभा घेण्यात आली. त्यावेळी सेवाग्राम पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ब्राम्हणे दारुविक्रेत्यांना उद्देशून बोलत होते. यावेळी सरपंच शालिनी आदमाने, उपसरपंच राहुल पाटणकर, तंटामुक्ती अध्यक्ष किरण गोमासे, पोलीस पाटील आम्रपाली ढोले यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच गावातील काही दारु विक्रेत्यांना यावेळी बोलविण्यात आले होते. यावेळी ठाणेदार श्री ब्राम्हणे यांनी दारु विक्रेत्यांना दम देत यानंतर जर दारुविक्री कराल तर खबरदार असा इशारा देत जेलची हवा खाल अशा शब्दात सांगीतले. आज पर्यंत दारु विक्रेत्यांवर इतकी कठोर कारवाई केली जात नव्हती परंतु आता मात्र कायद्याची कठोर अंमलबजावणी होईल त्यामुळे किमान दोन वर्ष जेलची हवा खावी लागेल तेव्हा सावधान व्हा असा सज्जड दम यावेळी त्यांनी दिला.
दारूमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून जगण्यासाठी दारु विकणे हा एकमेव पर्याय नाही वेगवेगळे उद्योग करून आपण आपल्या कुटुंबाचा भार उचलू शकतो तेव्हा दारु विक्री बंद करण्याचे आवाहन सरपंच शालिनी आदमाने यांनी केले. गावात जर कुणी दारुविक्री करीत असेल किंवा कुठलेही अवैध धंदे चालू असेल तर सुजाण नागरिक म्हणून याची माहिती पोलिस स्टेशनला देण्याचेही आवाहन यावेळी करण्यात आले. याप्रसंगी गावात पोलीस मदत केंद्र सुरु करण्याची मागणी उपस्थितांचे वतीने करण्यात आली. घडत असलेल्या घडामोडीमुळे व होत असलेल्या कारवाईमुळे दारु विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणानले असून हा व्यवसाय बंद करण्याची भूमिका पवनार येथील अनेक दारू विक्रेत्यांनी घेतली आहे.