वर्धा : बांधकामाचे साहित्य उचलून तसेच इतरांकडूनही साहित्य घेऊन त्याचे पैसे न देता चौघांनी जवळपास चार ते पाच जणांची तब्बल ५६ लाख ४५ हजार रुपयांनी आर्थिक फसवणूक केली. ही घटना भादोड पुनर्वसन गावात उघडकीस आली. याप्रकरणी २१ रोजी उत्तम महादेव राणे यांनी आर्वी पोलिसांत तक्रारा दिली असून, पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.
उत्तम राणे यांनी घर बांधकाम करून तीन गाळ्यांचे बांधकामही केले. दोन दुकाने अमित अनिल काळे (रा. आर्वी) याला दिले होते आणि अजमलसिंग (रा. गुजरात) याला बिल्डिंग सप्लायचे साहित्य ठेवण्यासाठी किरायाने दिले होते. अजमलसिंग याच्या व्यवसायात त्याचे साथीदार जगदीश सिंग, पिंटू, प्रेम संघवी हेदेखील सहभागी होते. त्या किरायाने दिलेल्या दुकानाचे नाव महावीर ट्रेडर्स असे होते. अजमलसिंगकडून ११ महिन्यांचा ५५ हजार रुपयांचा करारनामा केला होता, तसेच राणे यांनी ५ हजार रुपये महिन्याप्रमाणे त्यास घरही भाडेतत्त्वावर दिले होते.
अजमलसिंग याने 3४ हजार रुपये अँडव्हान्स दिला होता. मात्र, त्यानंतर २४ ऑगस्ट २०२२ पासून तो घरी परतलाच नाही. त्याला दिलेले सर्व साहित्यही तो घेऊन गेला होता. त्याचे साथीदारही फरार होते. मात्र, काही लोक अजमलसिंग व त्याच्या साथीदारांबाबत पैशाची विचारणा करण्यासाठी घरी येत होते. राणे यांची ५८ हजार रुपयांनी आर्थिक फसवणूक केली. तसेच अमित अनिल काळे यांच्याकडून ७५ हजारांच्या विटा व नगदी ३५ हजार रुपयांचे साहित्य घेऊन १ लाख १० हजारांचा चेक दिला, मात्र, तो धनादेशही अनादर झाला.