साहूर : अतिवृष्टी झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत खरीप पिकांसाठी १३६००, बागायतीसाठी २७०००, तर बारमाही पिकांसाठी ३६०००, असे सानुग्रह अनुदान जाहीर केले. शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा केले, मात्र, ज्या शेतकऱ्यांवर पीक कर्ज आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होताच साहूरच्या बंक ऑफ इंडिया शाखेने पूर्ण पैसे त्यांच्या कर्जात कपात केल्याने शेतकऱ्यांचे ऐन दिवाळीच्या तोंडावर दिवाळे निघाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.
ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाची रक्कम कर्जात कपात केल्याने सरपंच संघटनेने व गावकऱ्यांनी तहसीलदार सचिन कुमावत यांच्याकडे तक्रार केली. तहसीलदार यांनी शेतकऱ्यांचे अनुदानाचे पैसे कर्जातून कपात करू नये, असे पत्र बँकेला दिले. गावकऱ्यांनी सुद्धा अनुदानाचे कपात केलेले पैसे शेतकऱ्याला परत करण्यात यावे यासंदर्भात लेखी निवेदन दिले आहे. गावकऱ्यांनी आधीच शेतकरी अडचणीत असता तुम्ही अनुदानाचे पैसे कपात कसे काय केले? असा मॅनेजरला प्रश्न विचारला असता, बँक मॅनेजर व अधिकाऱ्यांनी सदर सानुग्रह अनुदानाचे पैसे आम्ही कपात केले नसून, आमच्या बँकेची सिस्टीमच तशी आहे. खात्यात पैसे जमा झाले की ते आपोआप गिळंकृत होतात, असे उत्तर दिले. साहूर व परिसरातील शेतकरी जानबा मोगरे, सुदाम पोटे, रामक्रृष्ण दंडाळे, ज्ञानेश्वर बापूराव मोगरे, मारुती बापूराव मोगरे, शरद बापूराव मोगरे यांच्यासह परिसरातील अन्य इतर शेतकरी अल्पभूधारक आहे.