

वर्धा : देवळी येथील ट्रान्सरेल लाईटिंग लिमिटेड कंपनीच्यावतीने सामाजिक दायित्वातून दोन अत्याधुनिक रुग्णवाहिका आरोग्य क्षेत्रात कार्यरत आसलेल्या प्रसिध्द कस्तुरबा आरोग्य संस्थेला तातडीची सेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने अत्याधुनिक पध्दतीच्या दोन रूग्णवाहिका भेट स्वरूपात देण्यात आल्या.
या रुग्णवाहिकेचे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या हस्ते फित कापून लोकर्पण करण्यात आले. तत्पुवी ट्रान्सरेल लाईटिंग लिमिटेड कंपनीच्यावतीने रुग्णवाहिकेची चावी व कागदपत्रे कस्तुरबा आरोग्य संस्थेचे सचिव बी.एस.गर्ग यांना सुपुर्द करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.नितीन गगणे तर अतिथी म्हणून कस्तुरबा रूग्णालयाचे अधीक्षक डॉ.एस.पी.कलंत्री, प्रशासकीय अधिकारी गिरीश देव तसेच ट्रान्सरेल लाईटिंग लिमिटेडचे डी. सूर्यनारयण, मनिष शेंडे, आनंद वर्मा, अजय सिन्हा, अजय जुमडे, राहुल उके, राहुल सोनुले, विनीत हिरडकर, सचिन गिरगावकर तसेच डॉ. शैलेश नागपुरे व धर्मपाल ताकसांडे उपस्थित होते.
या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना प्रेरणा देशभ्रतार यांनी या दोन रूग्णवाहिका रुग्णसेवेसाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या आहे. संस्थेचे प्रशासन आणि शिस्त चांगली असून वैद्यकीय सेवा ही महत्त्वाची आहे. आज आरोग्याच्यादृष्टीने विचार केल्यास आवश्यक सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. कोरोना काळात उत्तम प्रकारचे कार्य, सेवा व सहकार्य संस्थेने केले आहे, असे सांगून ट्रान्सरेन लाईटिंगच्या समाजोपयोगी उपक्रमाचे त्यांनी कौतूक केले. डॉ. बी. एस. गर्ग यांनी सर्व प्रथम दोन रूग्नवाहिका दिल्या बद्दल तसेच कोरोना काळात व्हेंटिलेटर देऊन जी मदत केली त्या बद्दल आपले आभार व्यक्त करतो. ही भेट आमच्यासाठी महत्वाची असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला ट्रान्सरेल लाईटिंग लिमिटेड कंपनीचे सर्व अधिकारी उपस्थित होते.