वर्धा : शहरातील एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिला जात असल्याची माहिती मिळताच जिल्हा बाल संरक्षण कक्ष तसेच चाईल्ड लाईनच्या प्रतिनिधींनी तालुका न्याय दंडाधिकारी रमेश कोळपे व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रशांत विधाते यांच्या मार्गदर्शनात घटनास्थळ गाठून बालविवाह रोखला.
बोरगाव (मेघे) भागातील रहिवासी असलेल्या एका २८ वर्षीय मुलाचा शहरातील रहिवासी असलेल्या एका अल्पवयीन मुलीशी विवाह लावून दिला जात असल्याची माहिती मिळताच तालुका न्याय दंडाधिकारी तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात अधिकाऱ्यांचे पथक लग्न मंडपात पोहोचले. यावेळी अधिकाऱ्यांनी वधू व वराच्या वयाची माहिती जाणून घेतली असता वधूचे वय १७ वर्ष एक महिनाच असल्याचे पुढे आले. अधिकाऱ्यांनी वधू व वर पक्षाच्या व्यक्तींना हा विवाह झाल्यास तो बालविवाह ठरेल आणि हा प्रकार कायद्यान्ववे गुन्हा ठरत असल्याची माहिती उपस्थितांना दिली. त्यानंतर वधू व वर पक्षाकडील मंडळींनी अधिकाऱ्यांच्या सूचनांना मान्य करीत लग्न सोहळ्याला थांबा दिला. शिवाय १८ वर्षांनंतरच मुलीचा विवाह लावू देऊ, अशी हमी दिली. यावेळी नायब तहसीलदार बाळूताई भागवत, पीएसआ ज्योती देवकुळे, माधुरी भोयर, सावंगीचे ग्रामविकास अधिकारी आर. एम. चौकसकर, वैशाली मिस्कीन, सचिन वाटगुळे, अमर कांबळे, पुरुषोत्तम कांबळे, जयश्री मिवल, माधुरी शंभरकर, अमर पाटील यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.