वर्धा : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्था तसेच युथ ऍड फाऊंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 23 ते 25 पर्यंत उद्धिमत्ता यात्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेमध्ये सहभागी झालेल्या सर्व तरुण-तरुणींना जिल्हा परिषद येथील स्व.सिंधुताई सपकाळ सभागृहात प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
उद्योजकतेसाठी ‘व्यक्तिमत्व विकास’या विषयावर येथील प्रसिद्ध व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षक सुरेश गणराज प्रमुख मार्गदर्शक या नात्याने तरुण-तरुणींना मार्गदर्शन करताना म्हणाले की, देशातील तरुणांनी आपला दृष्टिकोन मर्यादित न ठेवता विशाल दृष्टिकोन ठेवून त्यांनी स्वयंरोजगाराकडे वळावे. तरुणांनी स्वयंरोजगार सुरू केल्यास त्यांची भारताच्या आर्थिक विकास दर वाढविण्यास मदत होईल व भविष्यात भारत हा जागतिक सुदृढ असा देश होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
उद्योजकांच्या उद्योग समूहाच्या देशातील सामान्य नागरिकांना फायदा मिळत असतो. त्याकरिता स्वयंरोजगाराच्या माध्यमातून उद्योजक होणे गरजेचे आहे. भारताला अशा उद्योगांची गरज आहे. तरुण व्यक्तींनी आपली बुद्धिमत्ता देशाबाहेर न विकता त्याच्या देशाच्या विकासासाठी उपयोग करावा. जागतिक मंदी असताना सुद्धा भारताची विकासासाठी अर्थव्यवस्था उत्तम आहे. जागतिक मंदीमुळे आपल्याला घाबरण्याची गरज नाही. बदल हा सृष्टीचा नियम आहे अगदी त्याचप्रमाणे मागणी आणि उत्पन्नाची चक्र सतत फिरत असतात.
सुरेश गणराज पुढे म्हणाले की, भूतकाळाविषयी रडण्यापेक्षा वर्तमानकाळाशी लढण्यातच खरी मजा आहे, खरा पराक्रम आहे. भूतकाळ हा अनुभव आहे, वर्तमान हा प्रयोग आहे आणि भविष्यकाळ ही अपेक्षा आहे. इंग्रज भारतात येण्याआधी भारत अनेक बाबतीत समृद्ध होता असे ऐकण्यात येते. ते दिवस पुन्हा येतील यात काही शंका नाही, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमास मोठ्या संख्येने बचत गटातील महिला, युवक-युवती उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हा उद्योग केंद्राचे प्रतिनिधी, एम एसआरएलएमचे अधिकारी इंगोले, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थेचे जिल्हा समन्वयक धीरज मनवर, युथ ऍड फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक स्मिता नगराळे व सहकारी उपस्थित होते.