वर्धा : तापमानात मोठया प्रमाणात विक्रमी वाढ होत आहे. दोन दिवसांपूर्वी शहराचे तापमान 45 अंशावर पोहचले होते. वाढत्या तापमानामुळे दुधाळ जनावरांचे रट आरोग्य, प्रजनन, चयापचय क्रिया, आहार व दूध उत्पादनावर होत आहे. दुध उत्पादनात घट होऊ नये, याकरिता बदलत्या वातावरणानुसार जनावरांच्या दैनंदिन व्यवस्थापनातही बदल करणे आवश्यक असल्याचे मत पशुतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
अलीकडच्या काळात शेतीव्यवसाय बेभरवशाचा झाला आहे. यामुळे केवळ शेतीवर अवलंबून न राहता गावांमधील शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करतात. या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांना चांगले उत्पन्न मिळते. मात्र उन्हाळ्यात वाढत्या तापमानात जनावरांच्या गोठ्याचे व आहाराचे व्यवस्थापन न केल्यास जनावरांना उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. उन्हाळ्यात वातावरणातील वाढत्या उष्णतेमुळे जनावरांच्या शरीराचे तापमान वाढते. त्यामळे शरीराचे वाढलेले तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी शरीरातील उष्णता शरीराबाहेर टाकावी लागते.
वाढत्या तापमानाचा जनावरांच्या शरीरावर ताण पडल्याने जनावरे तापमान नियंत्रित करण्यासाठी अधिक पाणी पितात व चारा किंवा खुराक कमी प्रमाणात खातात. त्यामळे दुध उत्पादनात घट होते. वातावरणातील तापमान जास्त असल्याने जनावरांना शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी अधिक ऊर्जा खर्च करावी लागते याचाच परिणाम दूध उत्पादनावरही होतो.