समुद्रपूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या गोदामाला अचानक आग लागल्याने तेथे ठेवून असलेला नाफेडचा बारदाणा , जळून राख झाला. ही आग गुरुवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास लागली असून सर्वत्र धावपळ उडाली होती. या आगीमध्ये जवळपास २५ ते ३० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
बाजार समितीमध्ये आजपासून नाफेडच्यावतीने चण्याची शासकीय खरेदी सुरु होणार होती. याकरिता बाजार समितीच्या गोदामात बारदाणा सुरक्षित ठेवला होता. मात्र, गुरुवारी सकाळीच त्या गोदामाला अचानक आग लागल्याने संपूर्ण बारदाणा जळून राख झाला. या गोदामात २५ ते ३० लाख रुपये किमतीच्या बारदाण्याच्या ८० गाठी असल्याचे सांगण्यात आले. यासोबतच गोदामामध्ये शिल्लक असलेला इतरही बारदाणा जळाला असून गोदामाचेही मोठे नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच आटोक्यात आणण्याकरिता नागरिकांनी धाव घेतली. परंतु विद्युतपुरवठा बंद असल्याने पाण्यासाठी धावपळ करावी लागली. तेवढ्यात आगीने रौद्ररूप धारण केले होते.
अखेर विद्युतपुरवठा सुरु होताच प्रफुल्ल नागोसे यांच्या मालकीच्या बोअरवेलला पाइप लावून आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच समुद्रपूर नगरपंचायतीचा टँकर बोलावून पाण्याचा मारा केला. अग्निशमन दल पोहोचेपर्यंत या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आग विझविण्याकरिता नगरसेवक महादेव बादले, ललित डगवार, प्रदीप डगवार, राहुल लोहकरे, प्रफुल्ल नागोसे, मंगेश वाणी, गणेश पोटे, अमित लाजूरकर, गजू निघोट, नयन टेंभरे, प्रमोद धावडे, आशिष दांबेकर यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.