वर्धा : येथील सिंदी (मेघे) परिसरात असलेल्या बुद्ध टेकडी परिसरात अज्ञाताने आग लावल्याने या आगीत टेकडी परिसरातील अनेक झाडे जळून खाक झाली. बुद्ध टेकडी मित्रपरिवाराच्या काही सदस्यांना लाग लागल्याचे दिसताच त्यांनी टेकडी परिसरात पोहोचून आगीवर पाण्याचा मारा करून नियंत्रण मिळवले. आठवडाभरातील ही दुसरी घटना असून, आग लावणारा तो अज्ञात कोण? हे शोधण्याची गरज असून, या घटनेचा निषेध करण्यात आला.
आठवडाभरापूर्वी अज्ञाताने टेकडी परिसरात आग लावली होती. सायंकाळच्या सुमारास बुद्ध टेकडी मित्रपरिवाराचे सदस्य प्रकाश कांबळे, सुनील ढाले, प्रणोज बनकर, राजू थूल, राजेश कोल्हे हे झाडांना पाणी देण्यासाठी पोहोचले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
मात्र, पुन्हा तीच घटना घडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी बुद्ध टेकडी मित्रपरिवाराचे काही सदस्य बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभूमी महू या गावी गेले होते तर काही सदस्य जयंतीच्या कार्यक्रमात व्यस्त होते. अचानक सायंकाळी ५ च्या सुमारास पुन्हा अज्ञाताने टेकडी परिसराला आग लावली. या आगीने रौद्ररुप धारण केले तरीही बाजूलाच असलेल्या सेवाश्रममधील अनाथ विद्यार्थ्यांनी जिवाची पर्वा न करता ही आग विझवली. आगीत अनेक झाडं जळून खाक झाली आहेत. आग लावणाऱ्या अशा समाजकंटकाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.