वर्धा : बनावट कागदपत्रांच्या आधारे एका व्यक्तीला दोन भूखंडांची विक्री करून त्यांची ३७ लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आल्याने कैलास काकडे आणि त्याची पत्नी छाया काकडे यांच्याविरुद्ध ६ एप्रिल रोजी शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.
कैलास काकडे आणि छाया काकडे यांच्या नावे असलेला मौजा पिपरी मेघे येथील सर्व्हे नं. ४२/१ येथील मंजूर ले आउटमधील मालकीतील आराजी १६१४ चौ.चे दोन भूखंड इंडियन बँक शाखेकडे गहाण असून, यावर बँकेचे कर्जदेखील आहे. सूरज संतोष पोराटे यांना या दोन्ही भूखंडांवर कोणतेही कर्ज आणि बोजा नसल्याचे दाखवून बनावट कागदपत्रे तयार करून दोन्ही भूखंड सूरज पोराटे यांना तब्बल ३७ लाख ४४ हजार रुपयांना विक्री करून फसवणूक केली. या प्रकरणी चौकशी पूर्ण झाल्याने सूरज यांनी दिलेल्या तक्रारीवरून कैलास काकडे आणि छाया काकडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.