वर्धा : जनावरे बिमार पडत असून, मृत गायीच्या पोटात तब्बल 50 ते 60 किलो प्लास्टिकच्या पन्न्या निघाल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे सावंगी मेगे परिसरातील दावत हॉटेल परिसरातील कचरा तत्काळ हटवावा, असे आदेश वर्धा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी सावंगी मेघे ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. सावंगी मेघे येथील राजीवनगरातील नारायण काळुराम महापुरे या पशुपालकाने याबाबत पंचायत समितीकडे तक्रार केली होती. त्यात, महापुरे यांचा गायी-म्हशी पाळण्याचा व्यवसाय असून, त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. त्यांच्या जनावरांना हॉटेल दावतच्या जवळपास पाणी पिण्यासाठी खदान आहे. तेथे सर्व जनावरे पाणी पिण्यासाठी व चरण्यासाठी येतात.
सदर परिसरातील ग्रामपंचायतीच्या हद्दीमधील कचरा तसेच दवाखान्यातील कचरा घंटागाडीने आणून सदर खाणीमध्ये आणून टाकला जाते. त्यामध्ये सर्व प्रकारचे शिळे अन्न व प्लास्टिक पन्न्या असतात. खदानीच्या आजूबाजूला तक्रारकर्त्याचे जनावरे चरण्यासाठी जातात व तेथील जागेत असलेले शिळे अन्न व पन्न्या खाऊन जनावरांचे पोट फुगत आहे. त्यामुळे जनावरे बिमार पडत असन. एक गाय दगावली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तिचे पोस्टमार्टम झाले असता त्या गाईंच्या पोटात 50 ते 60 किलो पन्न्या निघाल्या आहेत. त्यामुळे अर्जदाराचे आर्थिक नुकसान झाले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.