वर्धा : गटशिक्षणाधिकाऱ्यांसह दोन शिक्षकांकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून काचनूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक असलेल्या विवेक यादवराव महाकाळकर (वय ५३, रा. इसाजी ले-आऊट, सुदामपुरी) यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी गटशिक्षणाधिकाऱ्यांसह दोन केंद्रप्रमुखांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मृत विवेक महाकाळाकर हे दिव्यांग असून ते काचनूर येथील जि.प. शाळेत मुख्याध्यापक म्हणून नोकरीवर होते. आरोपी हे नेहमी त्यांना दिव्यांग असल्याकारणाने चिडवायचे. तसेच हातमोड्या हातमोड्या म्हणून नेहमी त्यांची ॲक्शन करून त्यांना मानसिक त्रास द्यायचे. या नेहमीच्या त्रासाला कंटाळून अखेर विवेक महाकाळकर यांनी बुधवारी १६ रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, ठाणेदार सत्यवीर बंडीवार, एपीआय गणेश बैरागी यांनी भेट देत पाहणी केली. पाहणीदरम्यान तेथे सुसाईड नोट लिहिलेली दिसून आली. ते पत्र पोलिसांनी जप्त करीत काचनूर येथील सहायक शिक्षक मुकुंद बोराडे रा. वैष्णवी कॉम्प्लेक्स कारला रोड, गटशिक्षणाधिकारी धनराज तायडे रा. म्हाडा कॉलनी आणि वसंत खोडे यांच्याविरुद्ध विवेक महाकाळकर यांची पत्नी संगीता महाकाळकर यांनी शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे ठाणेदार बंडीवार यांनी सांगितले.