सेलू : शेतात सवंगणी केलेल्या पाच एकरातील हरभ-याच्या गंजीला अचानक आग लागून राखरांगोळी झाल्याची घटना सोमवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास रेहकी शिवारात घडली. या दुर्घटनेत शेतक-याचे जवळपास दोन लाख रुपयांचे मुकसान झाले असून, आगीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रेहकी येथील दादाराव शिंदे यांनी निर्मल जिनिंग लगतच्या साडेपाच एकरात हरभ-याची लागवड केली होती. या हरभ-याची गेल्या दोन दिवसांपासून सवंगणी सुरू आहे. पाच एकरातील हरभरा सवंगणी झाल्याने सोमवारी त्याची काढणीसाठी गंजी उभारण्यात आली तर उर्वरित अर्ध्या एकरातील हरभरा शेतातच उभा आहे.
यातील सवंगणी करून शेतातच गंजी लावण्यात आलेल्या हरभ-याच्या ढिंगाला सोमवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत पाचएकरातील हरभ-याचा संपूर्णतः कोळसा झाला. शेतकरी शिंदे यांचे यात जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अखिलेश गव्हाणे, कपिल मेश्राम व गजानन वाट यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याप्रकरणी नोंद करण्यात आली असून, आग नेमकी कशामुळे लागली यासंदर्भात मात्र अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. सदर आग ही उल्कावर्षावाने लागली की, अज्ञाताने लावली यासंदर्भात अद्याप संभ्रमावस्था कायम आहे.