सेलू : तालुक्यातील केळझर येथील प्रभाग क्रमांक 2 मधील कवडू सखाराम काळसर्पे (65) यांचा मृतदेह 13 मार्च रोजी सकाळी 8.30 वाजता गावापासून पाच किमी अंतरावर असलेल्या एका कालव्यात आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, 11 मार्चपासून कवडू घरून बेपत्ता होते. ते लाखडे आणण्यासाठी गेले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने अखेर कुटुंबियांनी 12 मार्च रोजी पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. सेलू पोलिसांनीही त्याचा शोध सुरू केला होता. अशा परिस्थितीत रविवारी सकाळी बांधलेली लाखडे कॅनलजवळ दिसली. याची माहिती मिळताच गावचे उपसरपंच सुनील धुमोणे हे त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी समृद्धी मार्गाला लागून असलेल्या मुख्य कालव्याच्या दिशेने शोध घेतला. सुमारे पाच किमी अंतरावर नानाजी दांडेकर यांच्या शेताजवळ कवडूचा मृतदेह दिसला. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सेलू पोलिस ठाण्याचे विजय कापसे, रवींद्र रघताटे, गजानन वाट घटनास्थळी पोहोचले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.