वर्धा : राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणास नकार दिल्याने आजपर्यंत जिल्ह्यात 100 चालक व 100 वाहक असे 200 कर्मचारी कामावर रुजू झाले असून, वर्धा विभागातून 80 नियमित बसगाड्या सुरू आहेत, अशी माहिती विभाग नियंत्रक चेतन हसबनीस यांनी दिली. निलंबित व डिसमिस केलेल्या कर्मचाऱ्यांना 10 मार्चपर्यंत रुजू होण्यासाठी शेवटचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. संपकरी कर्मचारी कामावर रुजू झाल्यास शुक्रवार 11 मार्चपासून जिल्ह्यातील बससेवा पूर्ववत सुरू होण्याचे संकेत आहेत.
शासनाने वेतनवाढीची घोषणा करूनही शासनात विलीनीकरण करण्यासाठी कर्मचाऱ्यांची मागणी सुरूच आहे. जिल्ह्यातील वर्धा, पुलगाव, आवीं, तळेगाव, हिंगणघाट या पाच आगारातून सद्यस्थितीला 80 बसगाड्या सोडण्यात येत आहेत. यापूर्वी नियमित वरील आगारात 228 बसगाड्या चालत होत्या. सध्या इयत्ता 12 वीची परीक्षा सुरू असल्यामुळे शहरी भागातच बससेवा सुरू असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांसह विद्यार्थ्यांचे परीक्षाकाळात हाल होत आहेत.
ज्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे, त्यांना रूजू करून घेण्यात येत आहे. तसेच डिसमिस केलेल्या कर्मचा-यांना विभागीय नियंत्रकाकडे अपील करून परत सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे अनेक आंदोलक कर्मचा-यांनी रूजू होण्याचा निर्णय घेतल्याने येत्या काही दिवसांत एसटी महामंडळाची जिल्ह्यातील प्रवासी सेवा पूर्ववत सुरू होईल, असे दिसून येते.