

वर्धा : स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर नराधम बापाने अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी बापाला प्रथमश्रेणी अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांनी कलम ६ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार आजन्म कारवासाची आणि दोन हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली, दंड न भरल्यास सहा महिन्यांच्या सश्रम कारवासाची शिक्षा आणि कलम ५०६ भादंवि नुसार दोन वर्षांच्या सश्रम कारवासाची शिक्षा ठोठाविण्यात आली. पीडितेला जिल्हा विधि सेवा प्राधिकरणकडून मनोधैर्य योजनेचा लाभ देण्याचेही आदेशित करण्यात आले.
पीडिता ही कुटुंबीयासोबत वर्धा लगतच्या गावात राहत असताना तिची सावत्र आई लहान भावासह शेतात काम करण्यास गेली असता आरोपी बापाने पीडितेचे लँंगिक शोषण करून तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती. पीडितेला धक्का बसल्याने ती घाबरून रेल्वे स्थानकावर पळून गेली होती. तिला स्थानकावर चाईल्ड लाईनची सदस्या भेटली. तिने पीडितेला वर्धा येथील बालगृहात नेले. त्यानंतर तिला काटोल येथील बालगृहात पाठवून तिला तेथील जि. प. शाळेत सातव्या वर्गाला प्रवेश देण्यात आला. आरोपी वडील हा पुन्हा काटोल येथे गेला आणि तिला स्वत:च्या घरी आणले. आरोपी वडील पुन्हा अत्याचार करेल या भीतीने पीडितेने घरातून पळ काढला आणि ती नागपूर येथील बालगृहात गेली.
दिवाळीच्या सुटीत आरोपी वडिलाने नागपूर गाठून पीडितेला पुन्हा घरी आणून तिच्यावर अत्याचार करीत जिवे मारण्याची धमकी दिली. अखेर नराधम बापाच्या त्रासाला कंटाळून पीडितेने घरातून पळ काढत सेवाग्राम रेल्वेस्थानक गाठले. तेथे चाईल्ड लाईनची सदस्या जयश्री निवल भेटली. पीडितेने घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला. निवल यांनी पीडितेला बाल कल्याण समितीच्या कार्यालयात नेले. त्यानंतर पीडितेला सेवाग्राम पोलीस ठाण्यात नेत नराधम बापाविरुद्ध तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक एस. बिसंदरे यांनी केला. तपासादरम्यान आरोपी बापाने गुन्हा केल्याचा सबळ पुरावा मिळाल्याने प्रकरण न्यायप्रविष्ट केले. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता विनय आर. घुडे यांनी यशस्वी युक्तिवाद केला. त्यांना पैरवी अधिकारी दिगांबर गांजरे यांनी सहकार्य केले.