वर्धा : गेल्या काही दिवसांपासून केसरीमल कन्या शाळेजवळ भाजीविक्रेते आणि पानठेलेवाल्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते. परिणामी, वाहतुकीस खोळंबा होत होता. याबाबत अनेक संघटनांनी नगरपालिकेकडे तक्रारी दिल्यानंतर नगरपालिका प्रशासनाकडून मंगळवारी 8 फेब्रुवारी रोजी भाजीविक्रेत्यासह पानठेल्यांची 30 दुकाने हटविण्यात आली.
छत्रपती शिवाजी चौकातून नागपूरकडे जाण्यासाठी या रोडवर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. या रोडवर केसरीमल कन्या शाळा व भारत ज्ञान मंदिरम्, अशा दोन शाळा आहेत. केसरीमल शाळेलगत रोडवर भाजीविक्रेत्यांनी व हातगाड्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. भाजीविक्रेत्यांनी या ठिकाणी दुकाने मोठ्या संख्येने थाटली होती. त्यामुळे ये-जा करणा-या वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत होती. व्यावसायिकांच्या उद्धट वागणुकीमुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्यामुळे वाहतुकीसाठी निम्माच रस्ता शिल्लक राहिला होता.