

वडनेर : नागपूर-हैद्राबाद महामार्गावरील दारोडा-वडनेर टोलनाक्याच्या शेजारी शेतात असलेल्या तनीश-बांबूच्या घराला शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. यात घरातील विविध साहित्य जळून कोळसा झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. ही घटना सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. राष्ट्रीय महामार्ग ७ वर वडनेर नजीकच्या टोलनाक्याच्या शेजारी पुरुषोत्तम मालेवार यांच्या शेतात तनीश- बांबूचे घर उभारण्यात आले. याच घराला सोमवारी अचानक लागलेल्या आगीने आपल्या कवेत घेत भस्मसात केले.
नागपूर येथील रहिवासी पुरुषोत्तम मालेवार याच तनीश-बांबूच्या घरात धाब्याची निर्मिती करणार होते. या घरात मागील अडीच वर्षांपासून संजय जोशी (रा. नागपूर) हे कुटुंबीयांसह वास्तव्याला होते. संजय जोशी हे काही कामानिमित्त सोमवारी नागपूरला गेले. तर त्यांची पत्नी प्रतिभा ही घटनेच्या काही कालावधीपूर्वी चिमुकल्याला घेऊन वडनेर येथील खासगी रुग्णालयात गेली होती. घरी कुणी नसताना अचानक शॉर्टसर्किटमुळे संपूर्ण घराला आग लागली. आग इतकी भीषण होती की राष्ट्रीय महामार्गाने ये-जा करणाऱ्यांना आगीचे लोळ सहज दिसत होते.
आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला; पण या आगीत दोन लाख रुपये किमतीचे दागिने तसेच विविध साहित्य जळून खाक झाले. या घटनेची नोंद वडनेर पोलिसांनी घेतली आहे. शॉर्टसक्रिटमुळे आग लागल्याचे बोलले जात असले तरी पोलिसांच्या सखोल चौकशीअंतीच वास्तव पुढे येणार आहे.