

हिंगणघाट : येथील मोहता मिल पूर्ववत सुरु करण्यात यावी, तसेच थकीत वेतन आणि बोनस देण्यात यावा, या मागणीसाठी मिल कामगारांनी तहसील कार्यालयासमोर २४ जानेवारीपासून साखळी उपोषण सुरु केले आहे. या उपोषणस्थळी माजी आमदार राजू तिमांडे यांनी भेट देत पुढील लढ्याबाबत चर्चा केली.
सध्या बंद असलेली मोहता मिल पूर्ववत सुरु करावी, कंपनी एनसीएलटीने सुरु करावी, मार्च, एप्रिल व मे २०२५मध्ये केलेल्या कामाचा मोबदला देण्यात यावा, नागपूर उच्च न्यायालयाने तीन महिन्यांच्या आत कामगारांचे वेतन देण्याचे आदेश दिले होते, ती मुदत १६ डिसेंबर २०२१ला संपली असूनही मिल चालकांनी कामगारांना तीन महिन्यांचे वेतन दिलेले नाही. ते मिळावे यासह अन्य मागण्यांसाठी कामगारांनी साखळी उपोषण सुरु केले आहे. मोहता इंडस्ट्रीजने मार्च २०२१मध्ये कामगारांचा तीन महिन्यांचा पगार व अर्धा बोनस न देताच काम देणे बंद केले. तेव्हापासून कामगार विनाकाम व विमावेतन जीवन जगत आहेत. कामगारांची परिस्थिती फारच दयनीय झालेली आहे.
कामगारांच्या मुलांचे शिक्षण, आरोग्याचे प्रश्न तसेच परिस्थितीअभावी कामगारांच्या मुलांचे लगसुद्धा होऊ शकले नाही, अशी गंभीर परिस्थिती कामगारांवर आली असून, त्यांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे. या उपोषणात कामगार ज्ञानेश्वर हेडाऊ, नाना पिसे, रंजित सिंग ठाकूर, महेश वकील, प्रवीण चौधरी, पंजाबराव लेवडे, प्रवीण झाडे, द्वारकादास जोशी, धर्मराज बेलखेडे, रवींद्र गोडसेलवार, प्रशांत डोके, विनोद ठाकरे, श्रीराम पिसे, संजय गंधेवार, रामेश्वर लाकडे, गजानन डोंगरे, प्रभाकर शेंडे, रामनारायण पांडे, शेखनसीर शेखदादामिया, महेश दुबे, दिलीप चौधरी, प्रकाश बुटले, राजकुमार खोब्रागडे, अजय देवढे, टीकमचंद चव्हाण, राजेंद्र कुसुरकर, राजू वैरागडे, शब्बीर मिर्झा, मोहन पोकले, प्रल्हाद मेसरे, ज्ञानेश्वर अंद्रस्कर, दीपक पर्धे, गणेश निमजे, संजय सायंकार, राजू नरड, दशरथ वैरागडे, देवराव साबळे, शंकर राडे, रमेश खरडे, विनोद दांडेकर, लीलाधर शिवणकर, विनोद ढगे, बबन बेलखेडे, देविदास लोणकर, मोरेश्वर लोणकर आदी सहभागी झाले आहेत.