वर्धा : पोलीस वसाहतीत चक्क पोलीस कर्मचाऱ्याच्या फ्लॅटसमोरच गृहरक्षक असलेल्या तरुणीने स्वत:च्या शरीरावर पेट्रोल टाकून पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना पिपरी मेघे परिसरात असलेल्या पोलीस वसाहतीतील ‘शरद’ नामक बिल्डिंगमध्ये रविवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने पोलीस दलात एकच खळबळ उडाली.
तरुणी गंभीररित्या भाजल्याने तिला पुढील उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस सुत्रांनुसार, शहरातील आदिवासी कॉलनी परिसरातील रहिवासी अंजली मैंद (३६) असे जखमी तरुणीचे नाव आहे. अंजली ही गृहरक्षक दलात कार्यरत असून, तिने पिपरी परिसरात असलेल्या पोलीस वसाहतीतील शरद या बिल्डिंगच्या दुसऱ्या माळ्यावरील एफ-२ क्रमांकाच्या घरासमोर स्वत:च्या शरीरावर पेट्रोल टाकून पेटवून घेतले. आगीचे लोळ उठत असतानाच तरुणीने पेटवून घेतल्याचे आजुबाजुला असलेल्या नागरिकांच्या लक्षात येताच तिच्या शरीराला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तरुणी ७० ते ८० टक्के भाजल्याची माहिती असून, तिला नागपूर येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी, उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्यासह रामनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. अंजली मैंद हिने आत्महत्येचा प्रयत्न का केला, ही बाब अद्याप कळू शकली नाही. शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.