सेलू : सेलू शहरात मागील वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या शिवभोजन केंद्राकडे कुठलाही अन्न परवाना नसल्याने आता हे केंद्र वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. याबाबत केंद्राला परवाना कसा मिळाला, असा आरोप करीत विनोद गोमासे यांनी याबाबतचे निवेदन तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांना दिले आहे.
सेलू येथे गुरू माउली गोपाल कृष्ण बहुउद्देशीय संस्थेकडे शिवभोजन केंद्र सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली होती. त्यानुसार केंद्र सुरू करण्यात आले. मात्र, भोजन केंद्र सुरू करण्यापूर्वी अन्नभेसळ विभागाचा परवाना आवश्यक होता. हा परवाना संस्थेकडे नसल्याने येथीलच दादू रेस्टॉरंटमध्ये शिवभोजन हे. भाडेतत्त्वावर सुरू करण्यात आले. संस्थेकडे अन्नभेसळ प्रतिबंधक परवाना नसल्याने त्या वेळी विनोद गोमासे यांचा परवाना जोडण्यात आला.
या रेस्टॉरंटमधून हे केंद्र दुसऱ्या जागेवर स्थलांतरित करण्यात आले. मात्र, या संस्थेजवळ अन्नभेसळ प्रतिबंधक विभागाचा परवाना नसताना, या केंद्राला मंजुरी मिळाली तरी कशी, असा आरोप विनोद गोमासे यांनी केला आहे. येथील शिवभोजन केंद्र चोरीला तर गेले नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोमासे यांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविले आहे. यावर काय कारवाई होते, याकडे आता लक्ष लागले आहे.