समुद्रपूर : जाम-हिंगणघाट महामार्गावरील पी. व्ही. टेक्सटाईल कंपनीतून अज्ञात चोरट्यानी १५ लाख १४ हजार ७३४ रूपयांचा माल चोरून नेला. या प्रकरणी तक्रारीवरून समुद्रपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील नऊ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ६ डिसेंबरला अटक केली. पण, मुख्य सूत्रधार फरार होता. आता समुद्रपूर पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह एकूण तिघांना अटक केली आहे.
सुरूवातीला अटक करण्यात आलेल्या नऊ आरोपींकडून पोलिसांनी ३०९ किलो तांबा, गुन्ह्यात वापरलेले असा एकूण १४ लाख ५६ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पण, गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार नौशाद कुरेशी तसेच त्याचे साथीदार कौसर अली, कामलेश उर्फ सलमान यादव हे फरार होते. मध्यरात्री गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी या तिघांनाही चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथून अटक केली आहे. या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करून त्यांची १६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी समुद्रपूर पोलिसांनी मिळविली आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम, समुद्रपूरचे ठाणेदार प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक रामदास खोत, अरविंद येनुरकर, रवी, पुरोहित, रवी वर्मा यांनी केली.