

सेवाग्राम : जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हाध्यक्ष दीपक कदम यांच्या मार्गदर्शनात महिला अध्यक्षे रोहिणी बाबर यांच्या नेतृत्वात निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
निवेदनात छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती, सारथी व डॉ. पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता या योजनांच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शासनातर्फे समन्वयक नेमण्यात यावा, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या नियमित व्याज परतावासाठी पुरेशी आर्थिक निधी देण्यात यावी, महामंडळाची व्याज परतावा योजना शैक्षणिक कर्जासाठी लागू करण्यात यावी, शेतकऱ्यांना उद्योगाप्रमाणे नियमित वीजपुरवठा करावा, महाज्योतीप्रमाणे सारथीच्या माध्यमातून मराठा कुणबी समाजाच्या गरजू विद्यार्थ्यांना मोफत टॅब व दरदिवशी ६ जीबी डेटा राज्य सरकारतर्फ द्यावा, एस्ईबीसीमधून निवड झालेल्या मराठा मुलांना तत्काळ नियुक्त्या द्यावा, राज्य सरकारचे शिष्यवृत्ती पोर्टल सुरू करावे, शेतीपंपाचे बिलं प्रमाणापेक्षा जास्त असून रक्कम कमी व्हावी, आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. मागण्यांचा विचार करून दखल घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अभिजित जांभुळकर, प्रा. उमाकांत इकरे, प्रा. मेसेकर, संजय कदम, लिना निकम, शैलजा साळुंखे यांनी निवेदनातून दिला आहे.