वर्धा : शहरासह जिल्ह्यात वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केल्या जाते. अशातच अनेकदा दंड वसूल केल्या जातो तर काहींना ई-चलानद्वारे दंड आकारल्या जातो. जिल्ह्यात तब्बल ३० हजार ५२१ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करीत १ कोटी १४ लाख ८४ हजार रुपयांचा दंड ई-चलानद्वारे ठोठावण्यात आलेला आहे. ७० टक्के दंडाची रक्कम अद्यापही भरल्या गेली नसून अशांवर आता कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलीस निरीक्षक धनाजी जळक यांनी सांगितले.
जानेवारी २०२१ ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. १६ हजार ५४५ चालकांवर कारवाई करीत तब्बल ४१ लाख ४ हजार रुपयांचा दंड बेशिस्तांकहून वसूल करण्यात आला. तसेच ३० हजार ५२१ चालकांना ई चलान देत त्यांना १ कोटी १४ लाख ८४ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आलेला आहे. हा दंड भरण्याकडे अनेकजण पाठ फिरवत असतात. मात्र, आता ज्या चालकाने ई-चलान भरले नाही, अशांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. त्यामुळे चालकांनी ई-चलान लवकरात लवकर जमा करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.