वडनेर : नजीकच्या वणी येथील गिमा टेक्सटाइल्समधील कॉटन पार्क भागातील गोदामाला अचानक आग लागली. यात गोदामातील विविध साहित्य जळून कोळसा झाल्याने सुमारे ५ कोटींचे नुकसान झाले आहे. ही घटना मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास घडली. वणीच्या गिमा टेक्सटाइल्समधील कॉटन पार्क भागातील गोडाऊनला आग लागल्याचे लक्षात येताच कार्यरत कर्मचाऱ्यांनी आगीवर पाण्याचा मारा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला.
आगीची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. माहिती मिळताच हिंगणघाट, वर्धा आणि पुलगाव येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी अग्निशमन बंबासह घटनास्थळ गाठले. तब्बल सहा तासांच्या प्रयत्नाअंती आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश मिळाले. माहिती मिळताच हिंगणघाट पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला, जळून कोळसा झालेल्या गोदामात सुमारे १ हजार ६०० कापसाच्या गाठी व दोन प्रेस मशीनसह विविध साहित्य होते. आगीत हे संपूर्ण साहित्य जळून कोळसा झाल्याने सुमारे पाच कोटींचे नुकसान झाले आहे. सदर आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.