कर्ज वसुलीकरिता शेतकरी बहीण-भावास शिवीगाळ! बँक व्यवस्थापकाचा अफलातून प्रताप

विजयगोपाल : येथील शेतकऱ्यांनी सामूहिक सातबाऱ्यावर इंडियन बँकेकडून पीककर्ज घेतले होते. सततच्या नापिकीमुळे ते कर्ज भरु न शकल्याने ४ लाखांचे कर्ज थकले. या कर्जाची वसुली करण्याकरिता बँक व्यवस्थापकाने शेतकरी महिलेशी मोबाईलवर संपर्क साधून शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या भावालाही घरी जाऊन अपमानास्पद वागणूक दिली. याप्रकरणी शेतकरी किशोरसिंग धुमाळे यांनी जिल्हाधिकारी व अग्रणी बॅक व्यवस्थापक यांच्याकडे तक्रार केली.

येथील शेतकरी किशोरसिंग भगतसिंग धुमाळे यांची मौजा विजय गोपाल येथे सामूहिक शेती असून सातबाऱ्यावर किशोरसिंग धुमाळे, भाऊ चंदनसिंग धुमाळे व बहीण नंदा ईश्‍वरसिंग ताजी यांचे नाव आहेत. या सातबाऱ्यावर चार लाखांचे कर्ज थकल्याने बँक व्यवस्थापकाने बहीण नंदा यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून शिवीगाळ करुन धमकाविले. तसेच किशोरसिंग यांच्या घरी जाऊन त्यांनाही शिवीगाळ करीत पंधरा दिवसात कर्ज न भरल्यास शेती लिलावात काढण्याची धमकी दिली,असे तक्रारीत नमूद आहे. किशोरसिंग यांनी बँक व्यवस्थापकाच्या या कार्यपद्धतीची कृषीमंत्री, जिल्हाधिकारी व अग्रणी बँक व्यवस्थापक यांच्याकडे तक्रार करुन कारवाईची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here