वर्धा : अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करून तिच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपी निरज प्रल्हाद देशमुख रा. धनोडी (नां) ता. आर्वी यास जिल्हा व सत्र न्यायालयाचे दंडासह सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
जिल्हा न्यायाधीश-२ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश वर्धा आर. व्ही. आदोने यांनी आरोपी नीरज देशमुख याला बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ नुसार सहा महिन्यांचा सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिन्यांचा कारावास, भादंविच्या कलम ५०९ नुसार सहा महिन्यांचा कारावास, ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास अतिरिक्त १५ दिवसाचा कारावास, कलम ५०६ नुसार सहा महिन्याचा सश्रम कारावास व ५०० रुपये दंड तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त १५ दिवसांच्या कारावासाची शिक्षा ठोठाविली आहे.
आरोपी नीरज हा पीडितेसोबत वेळोवेळी बोलण्याचा प्रयत्न करीत तिचा नेहमीच पाठलाग करायचा. १६ फेब्रुवारी २०१९ ला दुपारी नीरज हा पीडितेच्या घरी हातात काठी घेऊन आला. तो इतक्यावरच थांबला नाही तर त्याने वाद करून पीडितेच्या वडिलांना जीवानिशी ठार करण्याची धमकी दिली. या प्रकरणी आर्वी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक कविता फुसे यांनी पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. या प्रकरणात सात साक्षीदारांची साक्ष न्यायालयात तपासण्यात आली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद व पुराव्यांच्या आधारे न्यायाधीशांनी आरोपीला शिक्षा ठोठावली. शासकीय बाजू अँड. गिरीष तकवाले यांनी मांडली. पैरवी अधिकारी म्हणून स.फौ. अजय विनायक खांडरे यांनी काम पाहिले.