मुंबई : देशभरातील सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित दि. 1 नोव्हेंबर 2021 पासून अनेक मोठे बदल होणार आहेत. या बदलांचा तुमच्या जीवनावर थेट परिणाम होईल. या नवीन नियमांमुळे एकीकडे तुम्हाला दिलासा मिळणार आहे, तर दुसरीकडे काही गोष्टींची काळजी न घेतल्यास आर्थिक नुकसानही होऊ शकते.
सरकारने या नियमांमध्ये बदल केल्याने तुमच्या खिशावर परिणाम होईल. याचा परिणाम तुमच्या घरच्या बजेटवरही होईल. त्यामुळे त्यांच्याबद्दल जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
गॅस सिलिंडर
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात एलपीजी सिलिंडरची किंमत वाढू शकते, कारण एलपीजी सिलिंडरची नवीन किंमत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी जाहीर केली जाते. नोव्हेंबरमध्ये एलपीजीच्या किमती वाढवल्या जाऊ शकतात. एलपीजीच्या बाबतीत, कमी किंमतीच्या विक्रीतून होणारा तोटा हा अंडर रिकव्हरी 100 रुपये प्रति सिलेंडरवर पोहोचला आहे. त्यामुळे त्याच्या किमती वाढू शकतात. सध्या दिल्ली आणि मुंबईमध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत 899.50 रुपये आहे.
बँकिंगचे नियम
आता बँकांमध्ये पैसे जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी अधिक शुल्क भरावे लागणार आहे. बँक ऑफ बडोदाने याची सुरुवात केली आहे. पुढील महिन्यापासून विहित मर्यादेपेक्षा जास्त बँकिंग केल्यास वेगळे शुल्क आकारले जाईल. दि. 1 नोव्हेंबरपासून ग्राहकांना कर्ज खात्यासाठी 150 रुपये भरावे लागणार आहेत. खातेदारांसाठी तीन वेळा पैसे जमा करणे विनामूल्य असेल, परंतु ग्राहकांनी चौथ्यांदा पैसे जमा केले तर त्यांना 40 रुपये द्यावे लागतील. दुसरीकडे, जन धन खातेधारकांना यात काहीसा दिलासा मिळाला असून, त्यांना डिपॉझिटवर कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही, परंतु पैसे काढल्यावर 100 रुपये द्यावे लागतील.
पेन्शनधारक
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) दि.1 नोव्हेंबरपासून नवीन सुविधा सुरू करणार आहे. या अंतर्गत पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र (हयातीचा दाखला ) सादर करण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही. आता कोणताही पेन्शनधारक व्हिडिओ कॉलद्वारे त्याचे जीवन प्रमाणपत्र सादर करू शकणार आहे.