कारंजा (घाडगे) : घरगुती गॅस सिलिंडरला गळती लागल्याने त्याचा आवाज येत होता. याची माहिती शेजाऱ्यांना देण्यासाठी गेलेल्या महिलेच्या घरात अचानक भडका उडाला. ही घटना जसापूर येथे घडली असून, यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; परंतु घरातील साहित्यांसह रोख रक्कम जळाली.
बेबी बबनराव गोरे (रा. जसापूर) यांच्या घरातील सिलिंडरला गळती लागल्याने त्यातून आवाज सुरू झाला. बघता-बघता गॅस घरभर पसरला. याची माहिती शेजाऱ्यांना देण्यासाठी बेबी घराबाहेर पडल्या. तेवढ्यात भडका उडून घराला आग लागली. या आगीमध्ये घरातील धान्य, साहित्य जळून राख झाले. त्यांना घरकुल मंजूर झाले आहे. त्याकरिता बांधकामासाठी त्यांनी मुलीकडून तीस हजार रुपये आणले होते. ती रक्कमही आगीत जळाली.
अल्पावधीतच आगीने रौद्र रूप धारण केले होते; पण गावकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यामुळे आग आटोक्यात आली, अन्यथा संपूर्ण गाव आगीने कवेत घेतले असते, असे प्रदक्षदर्शींनी सांगितले. या घटनेची माहिती तलाठी व ग्रामसेवक यांना देण्यात आली; ग्रामसेवकांचा मोबाइल नॉट रिचेबल होता, तर तलाठ्यांना माहिती देऊनही ते गावात आले नाही. तसेच तहसीलदारांनाही वारंवार फोन केल्यानंतरही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
संजय आंधी निराधार योजनेचे अध्यक्ष टिकाराम चौधरी व पंचायत समिती सभापती चंद्रशेखर आत्राम यांनी घटनास्थळाला भेट दिली. चौधरी यांनी १५ दिवसांचा धान्यसाठा तर सभापती आत्राम यांनी ५ हजारांची तात्पुरत्या स्वरूपात मदत केली. गावकऱ्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीमध्ये बेबी गोरे यांची राहण्याची व्यवस्था केली.