पोलीस तपासात उघड! माजी नगराध्यक्षाचा पतीच निघाला ‘मास्टरमाईंड’; तिन्ही आरोपींना सात दिवसांचा पीसीआर

वर्धा : आर्थिक व्यवहारातून पालोती येथील रहिवासी वसंत चोखोबा हातमोडे (६५) याची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. वसंताच्या हत्येचा कट माजी नगरध्यक्षाचा पती भास्कर दादाराव इथापे याने रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून, भास्कर इथापेसह विलास मून, दिलीप नारायण लोखंडे रा. नागठाणा यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. तिघांनाही न्यायालयात हजर केले असता सात दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

मृत वसंत हातमोडे याचा मृतदेह रोठा तलावालगतच्या गेज चेंबरच्या विहिरीत सिमेंटच्या खांबाला बांधून फेकण्यात आला होता. याप्रकरणी वसंताचा मुलगा नीलेश याने सावंगी ठाण्यात तक्रार नोंदविलेली होती. सावंगी पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास केला असता मृत वसंत हातमोडे, भास्कर इथापे, विलास मून दिलीप लोखंडे यांनी बनावट कागदपत्रांद्वारे एका शेतीची विक्री करुन त्याचा मोबदला घेतला असल्याची माहिती मिळाली.

तसेच या प्रकरणात पुलगाव पोलीस ठाण्यात २०१९ मध्ये चौघांवर गुन्हा देखील दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी भास्कर इथापेसह दोघांना अटक केली असता त्यांनी हत्येची कबुली दिली. तसेच मृत वसंत हातमोडे हा अपहारातील रकमेची वारंवार मागणी करीत होता. तर या प्रकरणात वसंता हा फितूर होऊन आपल्याला शिक्षा लागू शकते, अशा भीतीपोटी त्याच्या हत्येचा कट रचून त्याला जिवानिशी संपविल्याचे भास्कर इथापे याने पोलिसांना सांगितले. तिन्ही आरोपींना अटक करून बुधवारी न्यायालयात हजर केले असता सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

पुढील तपास उपविभागीय अधिकारी पीयूष जगताप हे करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी यांनी पत्रपरिषदेतून दिली. ही कारवाई एसपी प्रशांत होळकर, यशवंत सोळंकी, एसडीपीओ पीयूष जगताप, पीआय संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाबासाहेब थोरात, डीबी पथक तसेच सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे, उपनिरीक्षक सौरभ घरडे, पोलीस उपनिरीक्षक गोपाल ढोले यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here