वर्धा : कोरोनाकाळात तांदूळ हा चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे, तांदूळ द्या अन ज्वारी, बाजरी, साखर घ्या, असे म्हणत व्यावसायिक गल्लोगल्ली फिरताना दिसतात, तांदूळ जेवणातील मुख्य घटक आहे. पण तो जर हातसडीचा असेल तर फारच उत्तम.
कुठलीही प्रक्रिया न केलेले किंवा पॉलीश न केलेले आणि हाताने सडलेले तांदूळ म्हणजे हातसडीचे तांदूळ. यातून आपल्याला प्रथिने, लोह आणि फायबर मिळतात. सुदृढ आरोग्यासोबत मधुमेह नियंत्रणासाठीही हे तांदूळ उपयोगी असल्याचे समोर येत असल्याने या तांदळाच्या मागणीत वाढ झाली आहे.
हल्ली यंत्राच्या साह्याने भाताच्या दाण्यांवरील साल/टरफल काढून त्याला पॉलिश केले जाते. यामुळे तांदूळ व साल यांच्या मध्यात असलेले प्रथिने, लोह व फायबर, क जीवनसत्त्व यांच्यासह अनेक पौष्टिक घटक नष्ट होतात. पण तांदळाला मात्र चांगलीच शुभ्रता येते. या तांदळाची किंमतही हातसडीच्या तांदळापेक्षा कमी असते. यामुळे सर्वसामान्य माणूस पांढऱ्या तांदळाचा अधिक प्रमाणात वापर करीत असल्याचे दिसून येते. असे असले तरी यंत्र साडीच्या तांदळापेक्षा हातसडीचा तांदूळ आरोग्यदायी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
हातसडीच्या तांदळावरचा कोंडा काढला जात नाही. त्यामुळे त्यांच्यातील व्हिटॅमिन्स आणि खनिज टिकून राहतात. हे दोन्ही प्रकारचे तांदूळ ज्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचतात. त्यातून दोघात फरक निर्माण होतो. पांढऱ्या तांदळाचा कोंडा काढून तो साफ केला जातो. त्यानंतर अनेक प्रक्रियांमधून जाऊन तो बाजारात पोहोचतो. या प्रक्रियेत तांदूळ चकाकतो. पण, पोषक तत्वे कमी होत जातात. यामुळे हातसडीच्या तांदळाला अधिक मागणी वाढत आहे.
४० पासून १०० रुपयांपर्यंत
हातसडीचा तांदूळ यंत्रसडीच्या तांदळाच्या तुलनेत किमतीने थोडा महाग असतो. याचे कारणही तसेच आहे. यातील पौष्टिक तत्वे कायम राहतात व ती आरोग्यासाठी फायद्याचे ठरतात. यामुळे या तांदळाची किंमत अधिक असते.
कोणत्या तांदळाला अधिक मागणी असते
जिल्ह्यात साधारणतः पांढऱ्या तांदळाला अधिक मागणी असते. पांढरा तांदूळ किमतीला कमी असल्याने सर्वसाधारण लोकांच्या आवाक्यात असतो. ग्रामीण भागात मोलमजुरी करणारे लोक अधिक प्रमाणात असतात. भलेही यात पौष्टिक तत्वे कमी असतात. पण किमतीने परवडत असल्याने याची मागणी अधिक आहे.
प्रक्रिया केल्याने प्रथिने, लोह, फायबर जाते निघून..
तांदळाच्या कोंड्यात व्हिटॅमिन बी ६ असते. पॉलीश केलेल्या तांदळात ते राहात नाही. तांदणावर यंत्राद्वारे बऱ्याच प्रक्रिया केल्याने टरफल व दाण्यांवरील असलेली पौष्टिक तत्वे नष्ट होतात.