

वर्धा : विद्युत् देयकाची वसुली करण्याकरिता गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. ही घटना सेलू तालुक्यातील खापरी येथे घडली असून, पोलिसांनी हल्लेखोरास अटक केली.
संदीप जगन उडान (रा. खापरी) असे आरोपीचे नाव आहे. महावितरणच्या सेलू उपविभागात खापरी हे गाव येते. ग्राहक संदीप उडान याने गेल्या तीन महिन्यांपासून वीज देयक भरले नसल्याने वरिष्ठ तंत्रज्ञ छगन बागडे हे त्याच्याकडे वीज देयकाच्या वसुलीकरिता गेले. त्यांनी संदीपला वीज देयक भरण्याची विनंती केली असता वाद घालून शिवीगाळ करीत चाकूने जीवघेणा हल्ला केला.
या घटनेची माहिती मिळताच कार्यकारी अभियंता स्वप्निल गोतमारे, साहाय्यकअभियंता धम्मदीप जीवतोडे, उपकार्यकारी अभियंता मनोज खोडे यांनी सेलू पोलीस स्टेशन गाठले. वरिष्ठ तंत्रज्ञ बागडे यांच्या तक्रारीवरून सेलू पोलिसांनी आरोपी संदीप उडान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.