आर्वीनाका चौकातील बेढब बांधकाम थांबवा! सेवानिवृत्त अभियंता फोरमचे बांधकाम विभागाला निवेदन; अपघातात वाढ होण्याची वर्तविली शक्यता

वर्धा : आर्वी नाका चौकात नगरपालिकेतर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी रस्त्याच्या मधामध मोठा चबुतरा बांधला आहे. यामुळे व्हीजन ऑबस्ट्रॅक होत आहे. या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ राहत असून, पुतळा बसविण्यासाठी एवढ्या मोठ्या आकाराचे बांधकाम करणे हा नागरिकांच्या जिवाशी खेळ करणारे ठरेल, त्यामुळे बेढब बांधकाम तत्काळ काढावे, अशी मागणी सेवानिवृत्त अभियंता फोरमने बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदनातून केली.

आर्वी नाका ते कारला रस्त्यावर आठ ते दहा मंगलकार्यालये आहेत. तसेच अभियांत्रिकी महाविद्यालय, जाजू ग्रामीण महाविद्यालय आदी आहेत. त्यामुळे रस्त्यावर मोठी वर्दळ असते. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयानुसार रस्त्याच्या मधात वा हद्दीत पुतळा न लावण्याबाबत निर्देशित केले आहे. पुतळा लावण्याची परवानगी कार्यकारी अभियंता देतील असे नमूद केले आहे.

आर्वी नाका चौकात बेढब बांधकाम सुरू असून, दोन बाय दोन फुटाच्या कॉलमवर पुतळा बसविल्यास व्हिजन ऑबस्ट्रॅक होणार नाही किंवा कारला चौकापर्यंत उजव्या बाजूला १०० फुट रुंदीच्या सर्व्हिसरोडसाठी शजागा उपलब्ध असून, त्या ठिकाणी पुतळा बसविल्यास कार्यक्रम घेण्यासही जागा होईल, त्यामुळे ते बांधकाम थांबविण्यात यावे, अशी मागणी प्र. ग. वानखेडे, शेळके, वि. वि. गुज्जेवार, व्ही. पी. श्रीगोड, वि. बा. बोभाटे, एस. एस. जुमडे, बकाने आदींनी केली.

वाहतुकीस अडथळा झाला नित्याचाच

आर्वीनाका परिसरात आधीच रस्त्याच्या दोन्ही बाजूला फळविक्रेते तसेच हातगाडी चालकांनी अतिक्रमण केले असून दररोज वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. पोलीस, नगरपालिका प्रशासनाला याबाबत अनेकदा अवगत करुनही याकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याने दररोज किरकोळ अपघात होत आहेत. याचा विचार करुन हे बेढब बांधकाम थांबविण्यात यावे.

पर्यायी जागा उपलब्ध करा

आर्वी नाका ते कारला चौकाकडे जाणाऱ्या मार्गाच्या दुतर्फा भाजीविक्रेत्यांनी दुकाने थाटली असून सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे अनेकदा अपघात घडतात. याच मार्गावर महाविद्यालयांसह मंगल कार्यालये असल्याने रस्त्याकडेला बसणाऱ्या भाजीविक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी परिसरातील नागरिकांतून केली जात आहे. याकडेही पालिकेने गंभीरतेने विचार करण्याची गरज निर्माण झाली असून लक्ष देणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here