

वर्धा : मागील काही दिवसापासून शहरातील अनेक चौकात चेंगड, जुगार खुलेआम सुरू आहे. अशातच कारला चौकात वीज बिल भरणा केंद्राच्या बाजूला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर जुगार खेळण्यास गेलेल्यांमध्ये आपापसात वाद झाला. काही वेळातच चाकू, तलवारी निघाल्या. मात्र, पोलिसांची चमू हातात दंडे घेऊन दिसताच जुगाऱ्यांनी सैरभैर पळ काढला.
परिसरातील नागरिकांनी यावेळी पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना याची माहिती देत, हा जुगार अड्डा तात्काळ बंद करण्याची मागणी केली. शहरातील कारला चौकात ‘दीपू’ नामक युवक चेंगड जुगार भरवतो. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास या जुगार अड्ड्यावर ‘कालू’ नामक युवक आपल्या मित्रांसह जुगार खेळण्यासाठी गेला असता, तेथे जुगारातील डावावरून आपापसात वाद निर्माण झाला. वाद उफाळू लागला. शिवीगाळ सुरू झाली. अन् मग काय चाकू अन् तलवारीही निघाल्या.
परिसरातील नागरिकांनी याची माहिती पोलीस अधीक्षकांसह उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना दिली. पोलिसांचा ताफा काही वेळातच घटनास्थळी पोहचला. पोलिसांना पाहून जुगाऱ्यांनी पळ काढला. या घटनेची तक्रार कुणीही दिली नसल्याने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मात्र, पोलिसांनी ‘कालू’च्या वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन काही वेळाने त्यांनाही सोडून दिल्याची माहिती मिळाली.