पुलगाव : शहराचा मुख्य रस्ता असलेला स्टेशन चौक परिसरात हार्डवेअर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले होते. नगरपालिका प्रशासनाने हे अतिक्रमण न काढल्याने अखेरीस पोलीस प्रशासनाला हस्तक्षेप करून कारवाई करावी लागली. पोलीस निरीक्षक शैलेश शेळके यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
शहरातील हार्डवेअर दुकानदारांनी केलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. या जागी वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी व मोठी रांग लागत होती. नागरिकांनी वारंवार नगर प्रशासनाकडे तक्रार केली, तरीही नगर प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही.
अतिक्रमण हटविण्याचे काम नगर पालिका प्रशासनाचे असून त्यांनी दुर्लक्ष केल्याने नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत पोलीस प्रशासनाला हे काम करावे लागले. हे अतिक्रमण हटविण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून नगर प्रशासनाला पत्रव्यवहार करण्यात आला. त्यानंतरही पालिकेला जाग न आल्याने ठाणेदारांनी कारवाईचा बडगा उगारला.
ही कारवाई पोलीस निरीक्षक शैलेश शेळके, राजेंद्र हाडके, चंद्रभान मेगरे, शरद सानप, खुशाल राठोड, पंकज टाकोने, मुकेश वादिले, बाबूलाल पंदरे, संतोष राठोड, दीपक तुमडाम, चंदू खोड, जगदीश जाधव यांच्या चमूने केली. या कारवाईमुळे अतिक्रमण करणारे व्यापारी धास्तावले आहेत.